free counters

Monday, June 27, 2011

मी वळूनी हासले, चुकले जरासे (गझल)






प्रश्न त्याचे टाळले, चुकले जरासे

उत्तराशी थांबले, चुकले जरासे



शीळ त्याची ओळखीची रानभूली

मी वळूनी हासले - चुकले जरासे



पाळले ना भान तू मज छेडतांना

लाजले मी लाजले, चुकले जरासे



भावनांना बांधले त्या, धुंद राती

आज का सैलावले चुकले जरासे



बंद होते द्वार माझे तव सुरांना

का कशी नादावले - चुकले जरासे



रोखले मी आसवांच्या आठवांना

शेवटी रागावले - चुकले जरासे



सोडतांना गांव जे मन घट्ट केले

त्या तिथे रेंगाळले चुकले जरासे



सांजछाया दाटल्या या अंगणाशी

मी पुन्हा भांबावले, चुकले जरासे



संध्या

२६.११.२०१०

Friday, June 10, 2011

स्वप्नांस शाप आहे............!

स्वप्नांस शाप आहे............!


रात्रीस छंद आहे, स्वप्नांत राहण्याचा
स्वप्नांस शाप आहे, रात्रीस जागण्याचा


गेल्या कितीक रात्री, उलटून चांदण्यांच्या
झाला सराव आता, अंधार साहण्याचा


या सागरास वाटे, आधार चंद्रमेचा
चंद्रास धाक आहे, अवसेस भागण्याचा


नजरेतले इशारे, ना जाणले तुझ्या मी
आहे खडा पहारा, डोळ्यांस पापण्यांचा


गंधाळल्या मिठीचा, हा श्वास खास आहे
श्वासांस भास आहे, आवेग थांबण्याचा


देहात आग आहे, विझवू कशी कुठे ही
पाण्यावरीच आहे, आरोप जाळण्याचा


लाचार सांज संध्या, धावा करू कुणाचा
कृष्णास बंध नाही, हाकेस धांवण्याचा



- संध्या



३० नोव्हें २०१० ला मायबोलीवर सर्वप्रथम प्रकाशित.

सांजसंध्या मराठी कविता माझ्या कवितांच्या ऑर्कूट कम्युनिटीवर दि. १ डिसेंबर २०१० रोजी प्रकाशित
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=98269986&tid=5545644043161422808

Saturday, May 29, 2010

वा-यास बंध आहे

रात्रीस पाहतांना, लावण्य चांदण्याचे

वा-यास बंध आहे, शालीन वागण्याचे


लाली अशी मनी ही, का दाटते उषेच्या

माझे मला कळेना, संगीत लाजण्याचे..


झंकारल्या मनाच्या, कंपीत या सुरांना

सांगू कसे बहाणे, आरोह टाळण्याचे


जडशीळ पापण्यांना, आसू असे सहारा

आर्जव हे तयांना, डोळ्यांत थांबण्याचे..


अंधार दाटतांना, ओल्याच भावनांना

देऊन गीत आले, हासून साहण्याचे


विश्रब्धसा किनारा, हा स्तब्धसा नजारा

प्रारब्ध पावलांचे, आजन्म चालण्याचे

संध्या

Thursday, March 4, 2010

सांजसंध्येच्या कविता

माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. ऑर्कूटवर आपण मला आणि माझ्या कवितांना जे प्रेम दिलेत त्याबद्दल शतशः आभार...! माझ्या कवितांसाठी या ब्लॉगला नक्की भेट द्या, आपले अभिपाय कळवा..
या ब्लॉगला भेट द्यावीशी वाटली याबद्दल पुन्हा एकदा आभार...