free counters

Saturday, May 29, 2010

वा-यास बंध आहे

रात्रीस पाहतांना, लावण्य चांदण्याचे

वा-यास बंध आहे, शालीन वागण्याचे


लाली अशी मनी ही, का दाटते उषेच्या

माझे मला कळेना, संगीत लाजण्याचे..


झंकारल्या मनाच्या, कंपीत या सुरांना

सांगू कसे बहाणे, आरोह टाळण्याचे


जडशीळ पापण्यांना, आसू असे सहारा

आर्जव हे तयांना, डोळ्यांत थांबण्याचे..


अंधार दाटतांना, ओल्याच भावनांना

देऊन गीत आले, हासून साहण्याचे


विश्रब्धसा किनारा, हा स्तब्धसा नजारा

प्रारब्ध पावलांचे, आजन्म चालण्याचे

संध्या

4 comments:

  1. जडशीळ पापण्यांना, आसू असे सहारा (२-६-४) * २
    आर्जव हे तयांना, डोळ्यांत थांबण्याचे (एक मात्रा कमी)
    ---
    अश्रूच हे सहारा ... आर्ज़व असे तयांना ('असे' शब्द दोनदा नसलेला बरा). इतरही काही दुसरे शब्द चालतील पण ती कमी भरणारी मात्रा फार खटकते आहे.

    > कंपीत या सुरांना
    ---- 'कंपित', 'कंपीत' नाही. कंपीत चालून ज़ाईल, पण 'या कम्पल्या सुरांना' मधे 'झंकारल्या - कंपल्या' अनुप्रासही ज़मतो.

    ही आपली इथली पहिलीच कविता दिसते आहे. (ऑर्कुटवर आपल्या किती कविता आहेत, कल्पना नाही.) आरम्भ तर खूप छान झाला आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  2. सुंदर आहे गझल.
    पहिल्या प्रयत्नाच्या मानाने तर अत्युत्कृष्ठ.
    पुढील लेखनास शुभेच्छा.

    तुमची लेखनेशैली मला आवडली/भावली असावी, असा माझा प्राथमिक अंदाज आहे.

    ReplyDelete